Tuesday, October 6, 2015

१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तिदिन

महाराष्ट्रातील पाच प्रांतांपैकी ऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभलेला भाग म्हणजे मराठवाडा. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारतीय संघराज्यात सहभागी व्हायचे की मुस्लिमबहुल पाकिस्तानात जायचे, अशा द्विधा मनस्थितीत असणार्‍या निझामाच्या हैदराबाद संस्थानात येणारा हा भाग. मात्र, भौगोलिक परीस्थितीमुळे हैदराबाद संस्थान भारतातच समाविष्ट झाले. तो दिवस म्हणजे १७ सप्टेंबर १९४८ आणि हाच दिवस मराठवाड्याचा मुक्तिदिन म्हणूनही साजरा करण्यात येतो. मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाचे औचित्य साधून या प्रांतात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मोगल सम्राट मोहम्मद शाह याने तुर्रानी वंशाच्या असफ जाह प्रथम याला १७२२ मध्ये मोगल साम्राज्याचा वझीर म्हणून नियुक्त केले आणि त्याला निझाम -उल-मुल्क अशी पदवी दिली. मात्र, साम्राज्यविस्तार करण्यासाठी त्याने दख्खनवर स्वारी केली आणि मराठवाडा त्याच्या अधिकारक्षेत्रात आला. त्याच्या वंशजांना निझाम ही उपाधी कायमचीच लागली.१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत आणि पाकिस्तान असे दोन नवे देश निर्माण झाले आणि निझामाने पाकमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. याविरोधात कारवाई करीत ‘ऑपरेशन पोलो’ अंतर्गत १७ सप्टेंबर १९४८ रोजी भारतीय लष्कराने हैदराबाद संस्थानात प्रवेश करून संस्थान भारतात समाविष्ट करून घेतले.
त्यानंतर, १ नोव्हेंबर १९५६ रोजी देशाची भाषावार प्रांतरचना झाली आणि मराठवाडा मुंबई प्रांतात समाविष्ट झाला. १ मे १९६० रोजी मुंबई प्रांताचे विभाजन होऊन गुजरात आणि महाराष्ट्र असे दोन राज्य निर्माण झाले आणि मराठवाड्याचा समावेश मराठी बहुभाषकांमुळे महाराष्ट्रात झाला.

No comments:

Post a Comment