सकाळी सूर्योदयानंतर, श्वासाचे नियमन करून एका विशिष्ठ क्रमाने १० किंवा १२ योगासने करणे याला सूर्यनमस्कार म्हणतात.सूर्यनमस्कार किंवा साष्टांग नमस्कार ही एक सूर्य उपासनाच आहे.यामुळे सर्वांगसुंदर व्यायाम होतोच पण आत्मिक, मानसिक, व शारीरिक सामर्थ्यही प्राप्त होते.हा व्यायम अल्पमोली आणि बहुगुणीआहे असे म्हणता येईल.
साष्टांग नमस्कार- उरसा शिरसा द्रष्ट्या वचसा मनसा तथा|
पद्भ्यां कराभ्यां जानुभ्यां प्रणामः अष्टाग उच्यते ||
मस्तक,छाती,दोन हात,दोन गुडघे , दोन पाय,दृष्टी,वाणी आणि मन या आठांनी जो नमस्कार करायचा त्याला साष्टांग नमस्कार म्हणतात.
हिंदू धर्मात सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सूर्य हे शैव पंथीय समाजात शंकराचे तर वैष्णव पंथीय समाजात विष्णूचे एक अंग मानले जाते. वेदांमध्ये व पौराणिक ग्रंथांमध्ये सूर्याची उपासना करण्याबद्दल अनेक संदर्भ सापडतात. उगवत्या व मावळत्या सूर्याला दंडवत घालणे हे सूर्यनमस्कारांचे प्रथम उद्दिष्ट आहे.
आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने। जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते ।।
जे साधक दररोज सूर्य नमस्कार करतील, त्यांना सहस्र जन्म दारिद्या येत नाही (काहीही कमी पडत नाही)
सूर्य नमस्कार हा सर्वागीण व्यायाम आहे. सर्व योगिक अभ्यासासाठी सुर्योदयाची वेळ सर्वोत्तम मानली गेली आहे. त्याच प्रमाणे सूर्य नमस्कार पहाटेच्या समयी सूर्योदयाला घालणे हितकारक आहे. उघड्यावर हवेशीर जागेवर रिकाम्या पोटी सूर्य नमस्कार घालावेत. मन शांत आणि प्रसन्न असल्यावर सर्व योगी अभ्यासाचा आपणावर विशेष परिणाम होतो.
प्रत्येक सूर्यनमस्काराची सुरुवात करताना प्रणामासनात खालील मंत्र म्हटले जातात. त्या त्या मंत्राचा शरीरातील चक्राशी संबंध आहे.
क्र. मंत्र चक्र
१ ॐ मित्राय नमः अनाहत चक्र
2 ॐ रवये नमः विशुद्धी चक्र
३ ॐ सूर्याय नमः स्वाधिष्ठान चक्र
४ ॐ भानवे नमः आज्ञा चक्र
५ ॐ खगाय नमः विशुद्धी चक्र
६ ॐ पूष्णे नमः मणिपूर चक्र
७ ॐ हिरण्यगर्भाय नमः स्वाधिष्ठान चक्र
८ ॐ मरीचये नमः विशुद्धी चक्र
९ ॐ आदित्याय नमः आज्ञा चक्र
१० ॐ सवित्रे नमः स्वाधिष्ठान चक्र
११ ॐ अर्काय नमः विशुद्धी चक्र
१२ ॐ भास्कराय नमः अनाहत चक्र
सूर्यनामांचा क्रम (सिक्वेन्स) लक्षात ठेवण्यासाठी खालिल श्लोकाचा काही जण उपयोग करतात
|| मित्र रवि सूर्य भानू खग पूष्ण हिरण्यगर्भ| आदित्य च मरिच सवित्रे अर्क भास्कर नमो नमः||
मित्र= जगन्मित्र , रवी= सर्वाना पूजनीय,सूर्य-प्रवर्तक,संचालक, भानू=तेज देणारा,खग= इंद्रिय उद्दीपक,पूषा-पोषण करणारा,हिरण्यगर्भ=वीर्यबळ वाढविणारा,मारीची=रोगनाशक,आदित्य= सर्वाकर्षक, सविता= सर्व उत्पादक, अर्क= आदरणीय, भास्कर= प्रकाशमान असे याचे अर्थ आहेत.
सूर्यनमस्कारांत वापरल्या जाणाऱ्या बऱ्याचशा आसनांचा ऐतिहासिक ग्रंथांत उल्लेख आढळतो. साष्टांग नमस्कार हे सूर्यनमस्कारातील एक आसन पुरातनकाळापासुन सूर्याला प्रणाम करण्याकरिता वापरले गेले आहे. धेरंड संहितेमध्ये भुजंगासन हे ३२ महत्त्वाच्या आसनांमध्ये गणले गेले आहे. अधोमुक्त श्वानासनाचे वर्णन मल्लपुराणात केले गेले आहे.
शिवाजी महाराज व समर्थ रामदास सूर्यनमस्कारांचा वापर शरीरसौष्ठवासाठी करत असत.
No comments:
Post a Comment