मानवी स्वभाव म्हणजे हातात पैसा आला की, तो खर्च झालाच म्हणून समजा. गरजेपेक्षा हौस महत्त्वाची ठरत असली, तरी भविष्याचे नियोजनही तेवढेच महत्त्वाचे ठरते. गरजेला महत्त्व देतानाही काटकसर करण्याकडे मात्र दुर्लक्ष नकोच नको. अनेकजण काटकसरीला कदाचित "कंजूषपणा' असे बिरूद लावतील; पण हा "कंजूषपणा' म्हणजे खर्चाला "काट' देत केलेली एकप्रकारची कमाईच आहे. इंग्रजीत एक म्हण आहे, "मनी सेव्ह इज मनी अर्नड्'. काटकसरीची कसरत स्वयंपाकघरापासून करत वीज आणि इंधन बचतीची प्रवृत्ती विकासाकडे घेऊन जाणारी आहे. अर्थात् काटकसरीचा गुण महिलांमध्ये जन्मजातच असतो. म्हणून "किचन किंग' म्हणून महिलांची ओळख आजही कायम आहे. देशाच्या प्रगतीत नागरिकांचेही सक्षमीकरण लपले आहे. हाच धागा पकडून इटलीमध्ये 30 ऑक्टोबर 1924 साली आंतरराष्ट्रीय बचत बॅंकेची स्थापना करण्यात आली. कार्यक्रम सुरू असताना एका इटालियन प्रोफेसरकडून कार्यक्रमाच्या शेवटी "आंतरराष्ट्रीय बचत दिन' घोषित केला. तेव्हापासून जागतिक बचत दिन अर्थात् काटकसर दिन पाळला जातो. काटकसरीच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्याला मदत मिळते, हा मुख्य हेतू यामागे होता. खर्चाचे नियोजन न करता मनमौजीपणे पैसा उधळल्यास हातात "शून्य' उरते. बचतीऐवजी उसणवारीवर जगण्याची वेळ येते. यातूनच सावकारी पद्धत पुढे येते. केवळ पैशाचीच नव्हे, तर वीज, पाणी, इंधन बचत करून काटकसर दिन साजरा करावा, अशी अपेक्षा डॉ. तारकेश्वर गोडघाटे यांनी व्यक्त केली. बचतगटांची क्रांती काटकसर दिनाचे प्रतीक अलीकडे खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्यात. आकर्षक राहणीमान तसेच मॉलसंस्कृती आल्यापासून खरेदीला उधाण आले. जी वस्तू बाहेर दोनशे रुपयाला मिळते, ती वस्तू तिथे चारशे रुपयाला मिळते. मग काटकसर कशी होईल. जिथे दोन पैसे वाचावे असे वाटते, तिथे अधिकचे पैसे खर्च होतात. अशावेळी बचतगटासारखे पर्याय पुढे आले आहेत. हे बचतगटही महिलांनीच तयार केले असून, उपराजधानीत आजघडीला चार हजारांवर बचतगट आहेत.
कशी करावी बचत
वेतनातील पाच टक्के रक्कम बॅंकेत जमा करावी
बचतगट, पोस्टात आवर्त ठेव गुंतवणूक करावी
सौरऊर्जेतून आणि कामापुरताच वीज वापर करावा
कमी अंतरासाठी सायकलचा वापर करावा
भूखंड, सोने खरेदीतून बचत करावी
काय करू नये
विनाकारण परदेश प्रवास टाळावा
छोट्या-छोट्या कारणासाठी मोटार काढू नये
वाहनाचा वेग नियंत्रित केल्यास इंधनाची बचत होते
उगाच विद्युत उपकरणे सुरू ठेवू नये.
आत्ताच्या संकटाच्या काळात काटकसर ही एक अलौकिक संवेदना जाणीवपुर्वक जागृत करावी लागेल त्यातून सर्वांचे हीत जपता येईल ,साध्या साध्या गोष्टीतून खूप साधता येऊन देशातील नागरिकांच्या समस्या कमी करण्यासाठी आपलाही हातभार लागेल
ReplyDelete