Wednesday, September 23, 2015

२९ सप्टेंबर जागतिक हृदय दिन

गेली बारा वर्षे (इसवी सन 2000 पासून) 29 सप्टेंबर हा दिवस "जागतिक हृदय दिन' म्हणून ओळखला जातो. हृदयाच्या बाबतीत सर्वांनी जागरूक राहावे, विशेषतः अकाली हृदयाचा त्रास होणे टाळता यावे, हृद्रोगामुळे होणाऱ्या अकाल मृत्यूचे प्रमाण घटावे, या उद्देशाने हृदय दिनाच्या दिवशी अनेक कार्यक्रम, चर्चासत्रे, प्रदर्शने, व्याख्याने आयोजित केली जातात. हृद्रोग होण्यामागची मुख्य कारणे उदा. तंबाखूसेवन, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव वगैरेंपासून परावृत्त होण्यासाठी आवाहन केले जाते.

आपणही जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधून हृदयाची काळजी कशी घ्यावी, हृदयरोग होऊ नये म्हणून काय करावे, काय काळजी घ्यावी, याची थोडक्‍यात माहिती घेणार आहोत.आयुर्वेदात शोणितकफप्रसादजं हृदयम्‌ । असे हृदयाचे वर्णन केलेले आहे. रक्‍तधातूच्या व कफाच्या प्रसाद भागापासून म्हणजेच सार भागापासून हृदय तयार होते. शरीरधारणेचे काम करणारा, स्थिरता, शक्‍ती देण्याचे काम करणारा जो प्राकृत कफ आहे, त्याच्या सार भागापासून आणि रक्‍ताच्याही उत्तम अशा सार भागापासून हृदय बनत असते.

हृदयावर मातृप्रभाव
हृदय हा मातृज अवयव असतो. म्हणजेच हृदयावर आईच्या प्रकृतीचा प्रभाव अधिक असतो. म्हणून गर्भधारणेपूर्वी स्त्रीचे रक्‍त, स्त्रीचा कफ प्राकृत असणे, उत्तम स्थितीत असणे आवश्‍यक असते. गर्भधारणेनंतरही गर्भाचे हृदय तयार होत असताना रक्‍तवर्धक, कफपोषक आहार-औषधद्रव्ये घेणे जरुरी असते.

हृदय हे रक्‍ताभिसरणाचे, अशुद्ध रक्‍त स्वीकारून फुप्फुसांच्या मदतीने शुद्ध करून, शुद्ध रक्‍ताचा संपूर्ण शरीराला पुरवठा करण्याचे काम करत असतेच; पण हृदय हे चेतनेचे, प्राणाचे, तसेच मनाचेही स्थान असते. हृदयावर आघात झाला असता ताबडतोब प्राण नष्ट होतात, म्हणून हृदयाला "सद्यःप्राणहरमर्म" असेही म्हटले जाते. फक्‍त शरीराच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर चैतन्यपूर्ण व उत्साही जीवन जगण्यासाठी, उत्तम मानसिक आरोग्यासाठीही हृदयाची काळजी घेणे खूपच आवश्‍यक असते. आयुर्वेदात निरोगी हृदयासाठी गर्भावस्थेपासून काय काळजी घ्यावी, हृदयाचे कार्य कसे चालते, हृदयाचे आरोग्य टिकविण्यासाठी काय काळजी घ्यावी, येथपासून ते हृद्रोग कशामुळे होऊ शकतात, ते कोणकोणत्या प्रकारचे असतात, त्यांच्यावर काय उपचार करायचे, या सर्व गोष्टी अतिशय समर्पकपणे समजावल्या आहेत.

No comments:

Post a Comment