Friday, October 9, 2015

11 जानेवारी लालबहादूर शास्त्री पुण्य दिन

लालबहादूर शास्त्री (रोमन लिपी: Lal Bahadur Shastri) (२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ - ११ जानेवारी, इ.स. १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हियेत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (तत्कालीन सोव्हियेत संघात, वर्तमान उझबेकिस्तानात) येथे दौऱ्यावर असताना ११ जानेवारी, इ.स. १९६६ रोजी यांचा हृदयविकाराचे दोन झटके येऊन मृत्यू झाला.

जीवन

२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ साली वाराणसी येथे एका गरीब, प्राथमिक शिक्षकाच्या घरी त्यांचा जन्म झाला. ते दीड वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे वडील निधन पावले. माता रामदुलारी आपल्या मुलांना पदराखाली घालून माहेरी आली. प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणशीला झाले. तेथे त्यांना निल्कामेश्वर प्रसाद असे पितृतुल्य गुरू भेटले. त्यांनी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय यांच्या जीवनदर्शनाचे तज्ञ्ल्त्;व त्यांना समजाविले.

वयाच्या अकराव्या वर्षी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची किनशिला बसविण्यासाठी आलेले गांधीजी त्यांना दिसले. तिथे त्यांच्या गाजलेल्या भाषणाने ते भारावून गेले. मग त्यांनी गांधीजींची पाठ सोडली नाही. चंपारण्य सत्याग्रह, रौलेट अ‍ॅक्ट, जालियनवाला हत्याकांड इत्यादी घटनांचे प्रतिसाद त्यांच्या मनात घर करून बसले. विदेशीवर बहिष्कार, स्वदेशीचा वापर यातच लालबहादूर गुंतले व त्यातून सुटताच पुन्हा विद्यापीठात दाखल झाले. काशी विद्यापीठाचे 'शास्त्री' झाले.( त्यांचे मूळ आडनाव 'श्रीवास्तव' हे होते.) 'सर्व्हटस ऑफ दि पीपल्स' सोसायटीचे सदस्य झाले. शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होते. समानतेचे सूत्र होते. इ.स. १९२८ साली लाला लजपतराय गेले व पुरूषोत्तमदास टंडन सोसायटीचे अध्यक्ष झाले. ते अलाहाबादला दाखल झाले. त्यांचीच अध्यक्ष म्हणून निवड झाली. विधायक कार्यकत्र्यांची ती पाठशाळाच होती. आचार्य नरेंद्र देव, आचार्य कृपलानी, डॉ. भगवानदास, डॉ. संपूर्णानंद, श्रीप्रकाश यांचा परिचय व मैत्री झाली.

नेहरू, शास्त्रीना काँग्रेसचे मवाळ धोरण मान्य नव्हते. इ.स. १९३७ मध्ये सत्याग्रह करून ते कारावासात गेले. सत्तेची लालसा नव्हती; पण इ.स. १९४६ साली निवडणुका झाल्या. ते गोविदवल्लभ पंतांचे सेेक्रटरी झाले. पंत गेल्यावर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. इ.स. १९५१ साली मध्ये त्यांनी पं. जवाहरलालजींनी त्यांना काँग्रेसचे सचिव केले. इ.स. १९५६ साली त्यांना रेल्वेमंत्रीपद दिले. पण एका अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी त्या पदाचा राजिनामा दिला. इ.स. १९५७ मध्ये त्यांनी काँग्रेसला निवडणुका जिंकून दिल्या. २७मे, इ.स. १९६४ला नेहरू गेले. त्यानंतर लालबहादूर एकमताने पंतप्रधान झाले. पाकिस्तानला ही सुसंधी वाटली. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. 'जय जवान, जय किसान' हा घोषणामंत्र वातावरणात निनादला. भारताने पाकिस्तानला नमविले. युनोने युद्धबंदी केली. रशियाने मध्यस्थी केली. १० जानेवारी, इ.स. १९६६ रोजी ह्रदयविकाराच्या तीव्र झटल्याने त्यांची जीवनज्योत मालवली. त्यांनी देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.

मृत्यूविषयी प्रवाद

शास्त्रींवर विषप्रयोग झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नी ललिता शास्त्रींनी सातत्याने केला. मृत्यूनंतर त्यांचे शरीर काळेनिळे पडले होते हा त्यांच्यावरील विषप्रयोगाचा पुरावाच असल्याचे अनेकांचे मत आहे. शास्त्रींच्या रशियन स्वयंपाक्याला त्यांच्यावर विषप्रयोग केल्याच्या आरोपावरून अटकही करण्यात आली होती, मात्र नंतर त्याची निर्दोष सुटका करण्यात आली. इ.स. २००९ साली अरूण धर यांनी माहितीहक्काच्या कायद्यानुसार पंतप्रधान कार्यालयाकडे शास्त्रींच्या मृत्यूचे कारण जाहीर करण्याची विनंती केली. पण पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती फेटाळून लावली. त्यासाठी कारण देताना यामुळे आपले इतर देशांशी असलेले संबंध बिघडण्याची शक्यता, देशात हिंसाचार उफाळून येण्याची शक्यता आणि संसदेच्या विशेषाधिकाराचा भंग होऊ शकतो असे नमूद करण्यात आले. पंतप्रधान कार्यालयाने शास्त्रींच्या मृत्यूबाबत एक दस्ताऐवज आपल्याकडे असल्याचा दावा केला, मात्र तो उघड करण्यास नकारही दिला. तसेच त्यावेळच्या सोवियत रशियाने शास्त्रींचे पोस्टमॉर्टेम न केल्याचे मान्य केले. पण, शास्त्रींचे वैयक्तिक डॉक्टर आर. एन. चुग आणि काही रशियन डॉक्टरांनी केलेल्या तपासणीचा अहवाल आपल्याजवळ असल्याचे मान्य केले. आपल्याकडील कोणताही दस्तऐवज नष्ट केलेला नाही वा गहाळ झालेला नाही हेसुद्धा पंतप्रधान कार्यालयाने नमूद केले. मात्र भारताने त्यांच्या पार्थिवाचे पोस्टमॉर्टेम केले वा नाही, तसेच शास्त्रींच्या मृत्यूबाबत कोणतीही दुर्घटना घडवून आणण्यात आली होती वा कसे याबाबत कोणतीही प्रतिक्रिया जुलै, इ.स. २००९ पर्यंत तरी गृहमंत्रालयाने दिलेली नाही.

6 जानेवारी पत्रकार दिन

बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर (जानेवारी ६, इ.स. १८१२; पोंभुर्ले, महाराष्ट्र - मे १८, इ.स. १८४६) हे मराठी भाषेतल्या आद्य पत्रकारांपैकी एक पत्रकार होते. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी जानेवारी ६, इ.स. १८३२ रोजी सुरू केले.

जीवन

जांभेकरांनी बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास आरंभला. इ.स. १८२५ साली त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले. मुंबईस येऊन ते सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांजकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले. ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान कमवले. इ.स. १८३४ साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली..

बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या भाषांचे ज्ञान होते. फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा मानसन्मान झाला होता.

जांभेकरांनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख व ताम्रपट यांचे शोधनिबंध लिहिले. मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम वाचकांच्या हाती दिली.

त्यांच्यात पांडित्य आणि अध्यापनपटुत्व या गुणांचा मिलाफ होता. गणित व ज्योतिष यांतही ते पारंगत असल्यामुळे त्यांची कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती. शिवाय त्यांना रसायनशास्त्र , भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र या विषयांचे उत्तम ज्ञान होते.

पत्रकारिता

मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकवताना, समाजात वावरताना बाळशास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत. पारतंत्र्याने ग्रासलेला देश, याबरोबरच समाजातील अनेक रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्र्य, भाकड समजुती यामुळे एतद्देशीय समाज कसा व्याधिग्रस्त झाला आहे, या विचाराने ते चिंताग्रस्त असत. त्यांना जाणवले की, केवळ महाविद्यालयात शिकवून उपयोग नाही; तर संपूर्ण समाजालाच धडे दिले पाहिजेत. श्रीपती शेषाद्री नावाच्या एका मुलाला त्यांनी योग्य मार्ग दाखवला; मात्र लवकरच समाजाचे प्रबोधन करण्यासाठी वृत्तपत्र काढावे, असे त्यांना वाटू लागले. या जाणिवेतून आपले सहयोगी गोविंद कुंटे आणि भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले.

जानेवारी ६, इ.स. १८३२ रोजी दर्पणाचा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांसाठी वृत्तपत्राची भाषा मराठी ठेवण्यात आली असली तरी ब्रिटिश शासनापर्यंत आपला आवाज जावा या हेतूने, वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्लिश भाषेत असायचा [१]. वृत्तपत्राची किंमत १ रुपया होती. इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषेत प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र! या अंकात दोन स्तंभ असत. उभ्या मजकुरात एक स्तंभ (कॉलम) मराठीत आणि एक स्तंभ इंग्रजीत असे. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी इंग्रजी मजकूर होता. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांना नवीन होती. त्यामुळे दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते. पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. दर्पण अशा रीतीने साडे आठ वर्षे चालले आणि जुलै, इ.स. १८४० ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.

दर्पण वृत्तपत्रासोबत मराठीतले पहिले मासिक 'दिग्दर्शन' त्यांनी इ.स. १८४० साली सुरू केले. 'दिग्दर्शन' मधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, व्याकरण, गणित तसेच भूगोल व इतिहासावर लेख प्रकाशित करत. भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी त्यांना या कामी मदत करत.[२] या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी ५ वर्षे काम पाहिले. या मासिकातून त्यांनी भूगोल, इतिहास, रसायन शास्त्र, पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान आदी विषयांवर्चे लेखन नकाशे व आकृत्यांच्या साहाय्याने प्रसिद्ध केले. या अभिनव माध्यमातून त्यांनी लोकांची आकलनक्षमता वाढवण्याचा प्रयत्‍न केला.

समाजकार्य

सार्वजनिक गंथालयांचे महत्त्व ओळखून 'बाँबे नेटिव्ह जनरल लायब्ररी' या ग्रंथालयाची जांभेकरांनी स्थापना केली. 'एशियाटिक सोसायटी'च्या त्रैमासिकात शोधनिबंध लिहिणारे ते पहिले भारतीय होते. ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती त्यांनी इ.स. १८४५ साली काढली. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात ते हिंदुस्तानी भाषेचे अध्यापन करत. त्यांच्या प्रकाशित साहित्यकृतींमध्ये 'नीतिकथा', 'इंग्लंड देशाची बखर', 'इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप', 'हिंदुस्थानचा इतिहास', 'शून्यलब्धिगणित' या ग्रंथांचा समावेश आहे. ‘दर्पण’ हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोकशिक्षणाचे माध्यम होते. त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला. यात विशेष उल्लेख त्यांनी हाताळलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाच्या प्रश्र्नाचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचा करावा लागेल. बाळशास्त्रींनी या विषयांवर विपुल लिखाण केले. त्यामुळे त्यावर विचारमंथन होऊन त्याचे रूपांतर पुढे विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत झाले. ज्ञान, बौद्धिक विकास आणि विद्याभ्यास या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटत. उपयोजित ज्ञानाचा प्रसार समाजात व्हावा, ही त्यांची तळमळ होती. देशाची प्रगती, आधुनिक विचार आणि संस्कृतीचा विकास यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची गरज आहे, तसेच सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याच्या विवेकनिष्ठ भूमिकेसाठी शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसाराची आवश्यकता आहे, याची जाणीव त्यांना झाली होती.[ संदर्भ हवा ] विज्ञाननिष्ठ मानव उभा करणे हे त्यांचे स्वप्न होते. थोडक्यात, आजच्यासारखा ज्ञानाधिष्ठित समाज त्यांना दोनशे वर्षांपूर्वीच अपेक्षित होता. त्या अर्थाने ते द्रष्टे समाजसुधारक होते. विविध समस्यांवर सकस चर्चा घडवण्यासाठी बाळशास्त्रींनी ‘नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी’ची स्थापना केली. यातूनच पुढे ‘स्ट्युडंट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटी’ या संस्थेला प्रेरणा मिळाली व दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड यांसारखे दिग्गज कार्यरत झाले.

साधारणपणे इ.स. १८३० ते इ.स. १८४६ या काळात बाळशास्त्रींनी आपले योगदान महाराष्ट्राला (व भारताला) दिले.

त्यांचे विचार प्रगमनशील होते. ख्रिस्त्याच्या घरात राहिल्यामुळे वाळीत टाकल्या गेलेल्या एका हिंदू मुलास त्यांनी तत्कालीन सनातन्यांच्या विरोधास न जुमानता शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेण्याची व्यवस्था केली. अल्पावधीच्या आजारानंतर मुंबईत त्यांचे निधन झाले.

सन्मान

‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’चे ‘नेटिव्ह सेक्रेटरी’, अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक, एल्‌फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये पहिले असिस्टंट प्रोफसर, शाळा तपासनीस, अध्यापनशाळेचे (नॉर्मल स्कूल) संचालक अशा अनेक मानाच्या जागांवर त्यांनी काम केले. त्यांना ‘जस्टिस ऑफ द पीस’ ही करण्यात आले होते (१८४०).

६ जानेवारी, इ.स. १८३२ रोजी दर्पण वृत्तपत्राच्या पहिला अंक प्रकाशित झाला, तसेच योगायोगाने ६ जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिवसही असल्यामुळे हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो.

3 जानेवारी बालिका दिन सावित्रीबाई फुले जयंती

सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले (जन्म : नायगाव-सातारा जिल्हा, जानेवारी ३, इ.स. १८३१ - मृत्यू : पुणे, मार्च १०, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.

सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणार्‍या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील. इ.स. १८४० साली जोतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.

सावित्रीबाईंचे पती जोतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकार्‍याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्‍यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.

१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.

१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.(यापूर्वी मिशनर्‍यानी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तरी भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी अॅन्ड सायंटिफिक सोसायटीने ’कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली, ती शाळा २०१५ सालीही चालू आहे. (मिशनरी नसलेले पिअरी चरण सरकार यांनी मुलींसाठी पहिली शाळा बारासात टाऊन येथे १८४७ मध्ये काढली. शाळेसाठी नवीन कृष्ण मित्र आणि काली कृष्ण मित्र या दोन भावांनी आर्थिक मदत केली. ही शाळा कालीकृष्ण हायस्कूल या नावाने चालू आहे. मुंबईत पारशी लोकांनी १८४९ मध्ये पहिली Co-ed शाळा काढली, पण काही दिवसातच या शाळेच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा दोन शाखा झाल्या.)

सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.

शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणार्‍या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.

जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.

केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.

इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणार्‍या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.

इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे व परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून मार्च १०, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.

सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले . पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले . दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या.

सत्कार

पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही. सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत.

सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.

दूरदर्शन

सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर दूरदर्शनच्या ’किसान’ वाहिनीवर २८ सप्टेंबर २०१५ पासून सोमवार ते शुक्रवार या काळात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील हिंदी मालिका दाखविली जात आहे..

सावित्रीबाईची प्रकाशित पुस्तके

    काव्यफुले (काव्यसंग्रह, १८५४)
    मातोश्री सावित्रीबाईंचे भाषणे व गाणी (१८९१)

सावित्रीबाई फुले यांच्यावरचे प्रकाशित साहित्य

    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका : शैलजा मोलक)
    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखक : ना.ग. पवार)
    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखक : नागेश सुरवसे)
    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (विद्याविकास) (लेखक : ज्ञानेश्वर धानोरकर)
    त्या होत्या म्हणून (लेखिका : डॉ. विजया वाड)
    ’व्हय मी सावित्रीबाई फुले’ हे नाटक (एकपात्री : प्रयोगकर्ती अभिनेत्री : सुषमा देशपांडे)
    साध्वी सावित्रीबाई फुले (लेखिका : फुलवंता झोडगे)
    सावित्रीबाई फुले (लेखक : अभय सदावर्ते)
    सावित्रीबाई फुले (लेखिका : निशा डंके)
    सावित्रीबाई फुले (लेखक : डी.बी. पाटील )
    सावित्रीबाई फुले -श्रध्दा (लेखक : मोहम्मद शाकीर)
    सावित्रीबाई फुले (लेखिका : प्रतिमा इंगोले )
    सावित्रीबाई फुले (लेखक : जी.ए. उगले)
    सावित्रीबाई फुले (लेखिका : मंगला गोखले)
    सावित्रीबाई फुले : अष्टपैलू व्यक्तिमत्त्व (लेखक : ना.ग. पवार)
    हाँ, मैं सावित्रीबाई फुले -(हिंदी), प्रकाशक : अझिम प्रेमजी विद्यापीठ
    ज्ञान ज्योती माई सावित्री फुले (लेखिका : विजया इंगोले)
    ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका उषा पोळ-खंदारे)
    Savitribai - Journey of a Trailblazer (Publisher : Azim Premji University)

सावित्रीबाई संमेलन/पुरस्कार

    सावित्रीबाई फुले यांच्या नावाने एक साहित्य संमेलन भरते. याशिवाय, द्वितीय ज्योती-सावित्री साहित्य संमेलन या नावाचे पहिले राज्यस्तरीय संमेलनही नागपूर येथे २-३ जानेवारी २०१२ या तारखांना भरले होते.
    सावित्रीबाई फुले यांच्या नावाने काही संस्थांनी पुरस्कार ठेवले आहेत. ते असे :-
        पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सामाजिक कार्यासाठीचा ’सावित्रीबाई फुले पुरस्कार’. हा पुरस्कार २०११-१२ सालापासून दरवर्षी, महिला-बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍यास एका समाजसेविकेस दिला जातो. ५००१ रुपये रोख,व सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
        महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार
        चिंचवडगाव येथील महात्मा फुले मंडळाचे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार
        महात्मा फुले प्रतिभा संशोधन अकादमी(पुणे)तर्फे सावित्रीबाई तेजस कला राष्ट्रीय पुरस्कार
        क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ’आदर्श माता’ पुरस्कार
        क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार
        सावित्रीबाई फुले महिलामंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणार्‍र्‍या स्त्रियांना दिले जाणारे स्त्रीरत्‍न पुरस्कार : आदर्शमातारत्‍न, उद्योग रत्‍न, कलारत्‍न, क्रीडारत्‍न, जिद्द रत्‍न, पत्रकारिता रत्‍न, प्रशासकीय रत्‍न, वीरपत्‍नी रत्‍न, शिक्षणरत्‍न, वगैरे.
        मराठी पत्रकार परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार
        क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार
        मध्य प्रदेश सरकारचा उत्तम शिक्षिकेसाठीचा एक लाख रुपयांचा वार्षिक सावित्रीबाई पुरस्कार (२०१२ सालापासून)

12 डिसेंबर स्वदेशी दिन

6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिदिन