Friday, October 9, 2015
28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन
महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले.
बालपण आणि शिक्षण
जोतीबा फुले यांचे मूळ गाव - कटगुण (सातारा) होते. गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला.. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले व होले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. जोतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. महात्मा फुल्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी ११ एप्रिल १८२७ साली झाला. वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय त्यामुळे फुले म्हणून ते ओळखण्यात येऊ लागले. व तेच नाव पुढे रूढ झाले. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. १८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.
सामाजिक कार्य
सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -
“विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
”
जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.
वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या विचारवंताच्या ‘राईटस् ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे आपल्या पत्नी सावित्रीबाईंना त्यांनी साक्षर केले. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे त्यांनी सांगितले. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्याच ा आसूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.
साहित्य आणि लेखन
'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.
31 ऑक्टोबर इंदिरा गांधी स्मृतिदिन
भारताच्या पंतप्रधान, नेहरू कन्या, गूंगी गुडिया, एक जबरदस्त नेतृत्व असे काही शब्द कानावर पडले की आपणास आठवण होते ती श्रीमती इंदिरा गांधी यांची आणि ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांच्या झालेल्या हत्याकांडाची; तसेच त्यानंतर सर्वत्र उसळलेल्या शीख विरोधी दंगलींची.
इंदिरा गांधी : एक प्रभावी नेतृत्व
इंदिराजींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. नेहरूकन्या असल्याकारणाने त्या लहानपणापासूनच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होत्या. नेहरूंच्या मृत्यूनंतर न खचता त्यांनी स्वत:चा राजकीय प्रवास सुरूच ठेवला आणि देशहिताचे अनेक निर्णय अंमलात आणले.
– १९५५ मध्ये त्या काँग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लेमेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या.
– १९६४ साली प्रथमत: केंद्रीय मंत्रीमंडळात निवड.
– तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणीमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.
– लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूनंतर २४ जानेवारी १९६६ रोजी प्रधानमंत्रिपदी विराजमान.
– १९६९ मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण असो वा पोखरण येथे पहिली अणुचाचणी असो, अशा अनेक घटनांमुळे त्या नेहमी चर्चेत असत.
– १९७७ साली देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला.
ऑपरेशन ‘ब्लू स्टार’ आणि इंदिरा गांधी :
इंदिराजींनी १९७५ साली देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला होता, त्यामुळे त्या १९८० पर्यंत सत्तेपासून दूर होत्या. मात्र १९८० नंतर झालेल्या निवडणुकांत मतदारांनी त्यांच्यावर परत एकदा विश्वास दाखवला. पण त्यांना यावेळी पंजाबमध्ये सुरू असलेल्या फुटीरतावादी आणि उग्र खलिस्तानवादी शक्तींशी सामना करावा लागला, त्याचवेळी इंदिराजींनी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला.
पंजाबमधील राजकीय घडामोडींना आलेला वेग :
१९८२ च्या ऑगस्ट महिन्यात अकाली दलाने धर्मयुद्ध मोर्चाची स्थापना केली. अन् दिल्लीहून श्रीनगरला जाणारे इंडियन एअरलाईन्सचे विमान अपहरण करून लाहोरला नेले. पाकिस्तानने विमान उतरवण्यास परवानगी नाकारली म्हणून पुन्हा अमृतसरला पाठवले. तेव्हा अपहरणकर्त्याला अटक करण्यात आली.
– २३ एप्रिल १९८३ ला पंजाब पोलिसचे डीआयजी अवतार सिंह अटवाल हे सुवर्ण मंदिर परिसरात दर्शनासाठी गेले असता त्यांची हत्या करण्यात आली.
– जून ते ऑगस्ट १९८३ दरम्यान अकाली दलातर्फे मोठ्या प्रमाणात बंद आणि रेल रोको पुकारण्यात आला.
– दहशतवाद्यांनी डिसेंबर १९८३ मध्ये सुवर्ण मंदिरातील अकाल तख्त येथे आश्रय घेतला.
– फेब्रुवारी १९८४ ला प्रीतलारी मासिकाचे संपादक आणि वरिष्ठ पत्रकार सुमित सिंह शाम्मी यांची हत्या करण्यात आली.
– एप्रिल १९८४ ला अमृतसरमध्ये भारतीय जनता दलाचे प्रमुख हरबन्सलाल खन्ना यांची हत्या झाली.
– याच दरम्यान अकाली दल व केंद्र सरकार यांच्यामध्ये चाललेल्या वाटाघाटी विफल झाल्याने अकाली दलाच्या नेत्यांमधील असंतोष विकोपाला गेला.
– शेवटी इंदिराजी पंतप्रधान असल्याकारणाने केंद्र सरकारने ऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय घेतला.
ऑपरेशन ब्लू स्टारची कारवाई आणि इंदिराजी :
३ जून १९८४ पासून भारतीय सेनेने सुवर्ण मंदिर परिसरात कारवाई सुरू केली होती. मंदिर परिसरातील इतर इमारतींचा ताबा घेऊन त्यावर मशीनगन्स बसवल्या गेल्या. ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व तत्कालीन मेजर जनरल कुलदीप सिंह ब्रार हे करत होते.मुख्यत: जर्नेल सिंह आणि त्यांचे साथीदार अकाल तख्त या अतिशय महत्त्वाच्या भागात लपून बसलेले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कराला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. जर्नेल सिंहाचे सशस्त्र समर्थक व इतर दहशतवादी दलांचे नेतृत्व तिथे शाबेग सिंह हे करत होते. (शाबेग सिंह हे पूर्वी भारतीय सैन्यात मेजर जनरल पदावर होते, १९७१ च्या भारत पाक युद्धात त्यांनी बांग्लादेशमधील मुक्तिवाहिनीच्या सभासद सदस्यांना प्रशिक्षित केलेले होते.) इंदिराजींच्या आदेशानुसार ‘ऑपरेशन ब्लू स्टार’आखून भारतीय सैन्याने सुवर्णंदिरामध्ये घुसून जर्नेल सिंह यांची हत्या केली खरी, परंतु याचे खरे परिणाम भोगावे लागले ते पुढे इंदिराजींना आणि इंदिराजींच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशाला. त्यावेळी भारत सरकारने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार या ऑपरेशनमध्ये भारतीय सेनेचे ८३ जण मारले गेले. यामध्ये ४ अधिकारी, ४ कनिष्ठ अधिकारी व ७५ जवान यांचा समावेश होता. सुमारे २०० जण जखमी झाले. तर ४०० पेक्षा जास्त दहशतवादी या कारवाईमध्ये मारले गेले.
ब्लू स्टार’कारवाईचे परिणाम :
कारवाई जरी पार पडली तरी देखील खलिस्तानवादी चळवळ लगोलग थंड झाली नाही. इंदिरा गांधींनी सुवर्ण मंदिरामध्ये घडवून आणलेल्या कारवाईमुळे शीख समुदायामध्ये तीव्र रोष निर्माण झाला. त्यामुळे भारतीय सैन्यामध्ये असलेल्या काही शीख सैनिकांनी देखील बंडाचा पवित्रा घेतला. त्याचाच परिणाम म्हणून इंदिराजींच्या रूपाने या भारतभूमीला एक सच्चा राजकारणी नेता आणि भारतरत्न गमवावा लागला.इंदिराजींची ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी सकाळी त्यांच्या अंगरक्षकांकडूनच हत्या करण्यात आली.
इंदिराजींची हत्या :
३१ ऑक्टोबरच्या सकाळी इंदिराजी त्यांच्या राहत्या घरामधून कामानिमित्ताने बाहेर पडल्या. त्या त्यांच्या घरासमोरील बगीचामधून बाहेर उभ्या असलेल्या कारपर्यंत जात असताना त्यांचे अंगरक्षक असलेल्या दोन इसमांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. सतवंत सिंह आणि बेअंत सिंह अशी नावे असलेल्या शीख समुदायातील या दोन तरुण अंगरक्षकांनी अक्षरश: गोळ्यांचा वर्षाव केला. एकामागून एक गोळी लागत गेली व शेवटी इंदिराजी जागीच धारातीर्थी पडल्या.सतवंत सिंहने त्याच्या हातांमध्ये असलेल्या स्टेनमगनमधून ३० राऊंड फायर करून इंदिराजींवर गोळ्या झाडल्या. इंदिराजींच्या जागीच पडलेल्या त्या मृतदेहाकडे पाहत ते दोघेही तिथेच थांबले अन् बेअंत सिंह म्हणाला, मला जे करायचे होते ते माझे करून झाले आहे, आता तुम्हाला काय करायचंय ते करा’am”(I have done what I had to do. You do what you want to do).
इंदिराजी यांची हत्या झाली यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. सलमा सुलतान यांनी इंदिराजींची हत्या झाल्याचे दूरदर्शनवरून जनतेला सांगितले. इंदिराजीनंतर कोण असा प्रश्न त्यानंतर जनतेपुढे पडला त्यावेळी राजीव गांधी यांचे नेतृत्व समोर आले.
हत्येनंतर उद्भवलेली परिस्थिती :
इंदिराजींच्या हत्येनंतर देशातील आणि विशेषत: दिल्ली स्थित शीख समुदायातील व्यक्तींच्या कत्तली करण्यात आल्या. देशात दंगल उसळली. राजीव गांधी पंतप्रधान झाले. परंतु देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होती एक शीख व्यक्ती. ग्यानी झैलसिंह हे देशाचे राष्ट्रपती होते.
इंदिराजींविषयी थोडक्यात :–
भारताच्या पंतप्रधान
– राम मनोहर लोहिया हे त्यांना गूंगी गुडिया म्हणून संबोधायचे.
– इंदिराजींनी १९६९ मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.
– भारत-पाकिस्तानमधील १९७१ चे युद्ध सफलता पूर्वक जिंकून बांगलादेशची निर्मिती केली.
– १९७१ सालीच इंदिराजींचा भारतरत्न देऊन भारत सरकारतर्फे सन्मान करण्यात आला.
– १९७५ मध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली.
– १९८४ मध्ये पंजाबमधील खलिस्तानवादी चळवळीस रोखण्यासाठी सुवर्णंदिरात ब्लू स्टार ऑपरेशनद्वारे कारवाईस पुढाकार.
– ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी स्वत:च्या अंगरक्षकांकडून गोळ्या घालून हत्या झाली.
30 ऑक्टोबर बचत दिन
मानवी स्वभाव म्हणजे हातात पैसा आला की, तो खर्च झालाच म्हणून समजा. गरजेपेक्षा हौस महत्त्वाची ठरत असली, तरी भविष्याचे नियोजनही तेवढेच महत्त्वाचे ठरते. गरजेला महत्त्व देतानाही काटकसर करण्याकडे मात्र दुर्लक्ष नकोच नको. अनेकजण काटकसरीला कदाचित "कंजूषपणा' असे बिरूद लावतील; पण हा "कंजूषपणा' म्हणजे खर्चाला "काट' देत केलेली एकप्रकारची कमाईच आहे. इंग्रजीत एक म्हण आहे, "मनी सेव्ह इज मनी अर्नड्'. काटकसरीची कसरत स्वयंपाकघरापासून करत वीज आणि इंधन बचतीची प्रवृत्ती विकासाकडे घेऊन जाणारी आहे. अर्थात् काटकसरीचा गुण महिलांमध्ये जन्मजातच असतो. म्हणून "किचन किंग' म्हणून महिलांची ओळख आजही कायम आहे. देशाच्या प्रगतीत नागरिकांचेही सक्षमीकरण लपले आहे. हाच धागा पकडून इटलीमध्ये 30 ऑक्टोबर 1924 साली आंतरराष्ट्रीय बचत बॅंकेची स्थापना करण्यात आली. कार्यक्रम सुरू असताना एका इटालियन प्रोफेसरकडून कार्यक्रमाच्या शेवटी "आंतरराष्ट्रीय बचत दिन' घोषित केला. तेव्हापासून जागतिक बचत दिन अर्थात् काटकसर दिन पाळला जातो. काटकसरीच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्याला मदत मिळते, हा मुख्य हेतू यामागे होता. खर्चाचे नियोजन न करता मनमौजीपणे पैसा उधळल्यास हातात "शून्य' उरते. बचतीऐवजी उसणवारीवर जगण्याची वेळ येते. यातूनच सावकारी पद्धत पुढे येते. केवळ पैशाचीच नव्हे, तर वीज, पाणी, इंधन बचत करून काटकसर दिन साजरा करावा, अशी अपेक्षा डॉ. तारकेश्वर गोडघाटे यांनी व्यक्त केली. बचतगटांची क्रांती काटकसर दिनाचे प्रतीक अलीकडे खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्यात. आकर्षक राहणीमान तसेच मॉलसंस्कृती आल्यापासून खरेदीला उधाण आले. जी वस्तू बाहेर दोनशे रुपयाला मिळते, ती वस्तू तिथे चारशे रुपयाला मिळते. मग काटकसर कशी होईल. जिथे दोन पैसे वाचावे असे वाटते, तिथे अधिकचे पैसे खर्च होतात. अशावेळी बचतगटासारखे पर्याय पुढे आले आहेत. हे बचतगटही महिलांनीच तयार केले असून, उपराजधानीत आजघडीला चार हजारांवर बचतगट आहेत.
कशी करावी बचत
वेतनातील पाच टक्के रक्कम बॅंकेत जमा करावी
बचतगट, पोस्टात आवर्त ठेव गुंतवणूक करावी
सौरऊर्जेतून आणि कामापुरताच वीज वापर करावा
कमी अंतरासाठी सायकलचा वापर करावा
भूखंड, सोने खरेदीतून बचत करावी
काय करू नये
विनाकारण परदेश प्रवास टाळावा
छोट्या-छोट्या कारणासाठी मोटार काढू नये
वाहनाचा वेग नियंत्रित केल्यास इंधनाची बचत होते
उगाच विद्युत उपकरणे सुरू ठेवू नये.
1 ऑक्टोबर रक्तदान दिन
ऑक्टोबर हीटमध्ये आयुर्वेदशास्त्राने पित्ताच्या विकारांना प्रतिबंध करण्यासाठी रक्तमोक्षण करण्यास सांगितले आहे. यामध्ये सिरींजच्या सहाय्याने शरीरातील ५० ते १०० मिली रक्त काढून टाकले जाते. त्यापूर्वी औषधी तुपाचे सेवन सांगितले आहे. अर्थात हे देखील योग्य सल्ल्याने करावे. परंतु या काळात सर्वाना साधणारा आणि गरजूंना उपयुक्त ठरणारा आणि ज्यात रक्तमोक्षणही साधले जाते, असा घटक म्हणजे रक्तदान होय. ज्या व्यक्ती रक्तदान करायला वैद्यकीयदृष्टया योग्य आहेत अशांनी या शरद ॠतुत अधिकृत रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले तर त्याने व्यक्तीला पित्ताच्या विकारांपासून बरेचसे संरक्षण मिळते. जागतिक रक्तदान दिन हा देखील ऑक्टोबर महिन्यात साजरा केला जातो. हाही एक योगायोग आहे. सतत तोंड येणे, अंगावर पित्त येणे अशा विविध पित्तविकारांवर रक्तदानाचा उपयोग होऊ शकतो.
Tuesday, October 6, 2015
१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तिदिन
२९ सप्टेंबर जागतिक रेबिज दिन
रेबीज हा ऱ्हायाबडोव्हायरस या कुटुंबातील विषाणू आहे. जंतुनाशकाला हा विषाणू अत्यंत संवेदनक्षम असून, वातावरणात तसेच शरीराबाहेर हा जास्त काळ जिवंत राहू शकत नाही. रेबीज हा रोग प्रामुख्याने रेबीजग्रस्त प्राण्याच्या चाव्यामुळे होतो. काही वेळा कातडीवरील जखमांना रोगी जनावराची लाळ लागल्यानेदेखील होतो. रेबीज रोगाने बाधित मृत जनावराचे मांस वटवाघुळ व इतर प्राणी खाल्ल्यामुळे त्यांना या रोगाची लागण होऊ शकते. रेबीजने बाधित कुत्रा, मांजर, माकड आदी रेबीज पसरविण्यास कारणीभूत ठरतात. या शिवाय लांडगा, कोल्हा, वटवाघुळ व मुंगूससुद्धा रेबीज रोग पसरवतात.
...असा होतो रेबीजचा प्रसार
1) पिसाळलेला कुत्रा माणसाला किंवा प्राण्याला चावला तर लाळेमध्ये असलेले विषाणू जखमेतून माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्या नंतर मज्जातंतूंद्वारे मध्यवर्ती मज्जासंस्थेत प्रवेश करतात. या ठिकाणी वाढ होण्यासाठी त्याला साधारण दोन ते तीन महिने लागतात. या कालावधीत अधिशयन काळ असे म्हणतात. या कालावधित रोगी कुठलीच लक्षणे दाखवत नाहीत.
2) एकदा लक्षणे दिसायला लागली, की मृत्यू अटळ समजावा. अधिशयन काळात हा विषाणू वेगाने वाढतो, मेंदूत पसरतो रोगाच्या सुरवातीच्या काळात म्हणजे "प्रोड्रॉमल' अवस्थेत काही लक्षणे दिसतात. मज्जातंतूंद्वारे विषाणू पृष्ठमज्जारज्जू व मेंदू या केंद्रीय मज्जा संस्थेच्या प्रमुख इंद्रियांपर्यंत पोचतात. केंद्रस्थानी पोचल्यानंतर हे विषाणू तेथील पेशींचा दाह निर्माण करून पेशींचा नाश करतात, त्यामुळे मज्जारज्जूंमुळे प्रभावित होणारी कार्यक्षमता बिघडते व त्या भागात बधिरपणा जाणवू लागतो.
3) घशाच्या स्नायूंचा बधिरपणा व पक्षाघातामुळे लाळ व पाणी गिळता येत नाही. यामुळे रेबीजग्रस्त माणूस किंवा प्राणी सतत लाळ गाळतात.
4) रेबीजचे विषाणू रक्ताद्वारे मेंदूतून रक्तावाटे शरीरातील इतर महत्त्वाचे अवयव उदा. यकृत, मूत्रपिंड, हृदय, स्वादूपिंड, फुफ्फुसे यात पोचतात. लाळेद्वारे जखमेत शिरतात. मज्जा संस्थेच्या पेशीचा नाश झाल्यामुळे होणाऱ्या बधिरपणा बरोबरच श्वास घेण्याच्या स्नायूची क्रियादेखील बंद होते, मृत्यू ओढवतो.
रोगजंतू प्रवेशानंतर रोग किती दिवसात होतो?
1) रोगजंतूंचा शरीरात प्रसार चावा घेतलेली (विषाणू बाधित) जागा व मेंदूतील अंतर यावर अवलंबून आहे.
2) मेंदू व बाधित जागेतील अंतर जेवढे कमी तेवढे रोगाची लक्षणे लवकर दिसतात. तोंडाजवळ चावलेल्या जखमेपेक्षा पायावर चावलेल्या जखमेतून मेंदूचे अंतर जास्त असल्याने हा काळ बराच जास्त म्हणजे काही आठवडे किंवा काही महिने ते वर्ष इतका मोठा असू शकतो. याशिवाय चावा घेतलेली जखम मोठी असेल आणि त्यात विषाणूंची संख्या अधिक असेल, तर रोगाची लक्षणे अधिक लवकर दिसतात.
3) कुत्र्याने किती ठिकाणी चावा घेतला यावरही रोगाची लक्षणे लवकर किंवा उशिरा दिसणे अवलंबून असते.
4) एका ठिकाणी चावा घेतल्यापेक्षा दोन-तीन ठिकाणी चावा घेतलेल्या जनावरात, माणसात रोगाची लक्षणे लवकर व अधिक तीव्रतेने दिसू शकतात.
रेबीजची लक्षणे ः रेबीजग्रस्त कुत्रा/ मांजर चावल्यानंतर सर्वसाधारणपणे 20 ते 30 दिवसांत रोगाची लक्षणे दिसतात; परंतु काही वेळा यापेक्षाही अधिक काळ म्हणजे काही महिने ते वर्ष लागतात. कुत्रा चावल्यानंतर निदान 15 दिवस तो सुदृढ राहिल्यानंतर रेबीजमुक्त आहे, असे समजायला हरकत नाही.
जनावरात आढळणारे रेबीजचे प्रकार ः
1) चवताळलेला प्रकार 2) मुका प्रकार
कुत्र्यात व गाई म्हशींत वरील दोन्ही प्रकार दिसून येतात. तर मांजर, कोल्हा, लांडगे या प्राण्यांत चवताळलेला प्रकार अधिक असतो. आपल्या देशात मुख्यत्वेकरून चवताळलेला रेबीजचा प्रकार अधिक प्रमाणात आढळतो.
मुका प्रकार ः
1) या प्रकारात कुत्र्याच्या हालचाली कमी होऊन ते सुस्त व आळशी बनतात. माणसापासून दूर राहतात. घराच्या कुठेतरी कोपऱ्यात किंवा फर्निचर खाली अंधाऱ्या जागेवर जाऊन बसतात, अशा कुत्र्यांना ओरडता येत नाही.
2) कुत्र्यांचा खालचा जबडा लुळा पडतो व लाळ गळते. थरथर कापतात, त्यांना लुळेपणा येतो. जमिनीवर पडून राहतात.
3) शांत अवस्थेत तीन दिवसांत मरतात.
4) तीव्र प्रकारात जनावरे अतिशय उग्र होतात. माणसाच्या अंगावर धावून येतात, शिंगे व डोके झाडावर किंवा भिंतीवर आदळतात.
5) डोळे लाल होतात, तोंडाला फेस येतो, चारा खाणे व रवंथ करणे बंद होते, बैल वारंवार थोडी थोडी लघवी करतात.
6) जनावरे घोगऱ्या आवाजात ओरडतात. कमी तीव्र, प्रकारात जनावराच्या कातडीला स्पर्श केला तरी त्याची जाणीव होत नाही.
चवताळलेला प्रकार ः
1) या प्रकारात कुत्रे निरनिराळी लक्षणे दाखवतात. कुत्र्याचे खाण्यापिण्यावर लक्ष राहात नाही. रोजच्या सवयीत बदल होतो, कुत्रा मालकाचे आदेश पाळत नाही. एकाकी शांत राहतो, लाळ गाळतो. यापुढील अवस्थेत कुत्रा संबंधित माणसापासून दूर राहतो.
2) कुत्रा अतिशय उत्तेजित होतो. मोकळा सोडल्यास भटकंती मार्गात येणाऱ्या सजीव वा निर्जीव वस्तूंना चावा घेतो. विनाकारण भुंकतो, घोगरा आवाज येतो.
3) अखाद्य वस्तू उदा. लाकडाचा तुकडा, दगड इत्यादी चघळतो किंवा गिळून टाकतो. खूप दूरवर पळत जातो. बऱ्याच वेळा घरी परत येत नाही.
4) थोड्या थोड्या वेळाने लघवी करतो. लाळ गाळण्याचे प्रमाण वाढते, डोळे लालभडक होतात. पक्षाघात किंवा पंगू होण्याची अवस्था चार ते सात दिवसांपर्यंत राहते.
5) कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज घोगरा होतो किंवा आवाज बंद होतो, तोंडाच्या खालचा जबडा लुळा पडतो व जीभ बाहेर येते. मान खाली किंवा वाकडी होते. शेपटी सरळ दिसते कुत्रा अडखळत झोकांड्या खात चालतो, नंतर चक्कर येऊन पडतो. मागचे पाय लुळे पडल्याने उभा राहू शकत नाही. शेवटी श्वासोच्छ्वास बंद पडल्याने मृत्यू होतो.
माणसातील लक्षणे ः 1) माणसात पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर साधारणपणे 10 ते 90 दिवसांत रोगाची लक्षणे दिसतात. तीव्र डोकेदुखी, ओकारी आल्यासारखी वाटते.
2) नाका-डोळ्यांतून पाणी वाहणे/ गळणे, घशाला कोरड येणे, जेवण न करणे व पाणी पिणे बंद होणे. पाण्याची भीती वाटायला लागते. चेहऱ्यावरचे स्नायू निष्प्राण होतात.
3) जसजसा हा विषाणू मेंदूचा ताबा घेतो, तसतसे क्लेशदायक झटके येतात. घेतलेले द्रव्य पदार्थ तसेच तोंडावाटे बाहेर पडतात. अखेरीस रोगी बेशुद्ध होतो आणि 7 ते 10 दिवसांत मृत्यू पावतो.
प्रथमोपचार ः 1) कुत्रा चावल्यानंतर करावयाच्या प्रथमोपचाराचा मुख्य उद्देश रेबीज रोगापासून प्रतिबंध करणे हाच असतो. रेबीजग्रस्त किंवा मज्जासंस्थेशी निगडित लक्षणे दाखवतात.
2) कुत्रा किंवा मांजर चावल्यास त्वरित ती जखम धावत्या पाण्याखाली पकडून धुऊन टाकावी. त्यानंतर जंतुनाशक मलम लावावे. जखम स्वच्छ केल्यावर हात स्वच्छ धुवावेत. जखमेतून रक्त जर जास्त प्रमाणात वाहत असेल तरच त्यावर पट्टी बांधावी.
3) जखमेवर हळद, चुना किंवा इतर कुठलेही पदार्थ लावू नयेत. जखमेवर टाके देऊ नयेत.
4) चावलेला कुत्रा जर माहितीचा असेल, तर त्याला रेबीज प्रतिबंधक लसीकरण झालेले आहे की नाही, याची सविस्तर माहिती घ्यावी. अशा कुत्र्यांवर 10 ते 15 दिवस बारकाईने लक्ष द्यावे.
5) रेबीज रोगप्रतिबंधक लस दिलेल्या कुत्र्यास जर पिसाळलेला कुत्रा चावला, तर लसीची किमान अर्धी मात्रा तरी देऊन घ्यावी. पूर्ण मात्रा देणे उत्तम. कारण क्वचित प्रसंगी लसीकरण करतेवेळी कुत्रा आजारी/ अशक्त असेल, लस योग्य त्या तापमानास साठवलेली नसेल, योग्य त्या मात्रेत लस न टोचली गेल्यास किंवा लसीची कालमर्यादा संपल्यानंतर जर दिली असेल, तर त्या कुत्र्यात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होत नाही.
6) आपल्या कुत्र्यास रोगप्रतिबंधक लस न दिलेला, परंतु सर्वसामान्य दिसणारा एखादा कुत्रा चावला, तरी सुद्धा लसीकरण करणे उचित असते, कारण वरवर सर्वसामान्य दिसणाऱ्या एखाद्या कुत्र्याच्या लाळेतही रेबीजचे जंतू असू शकतात.
7) वैद्यकशास्त्रातील प्रयत्नाने आता रेबीज नियंत्रणासाठी उच्च दर्जाच्या लसीची निर्मिती केली आहे. या लसी महाग आहेत. पण अत्यंत सुरक्षित आणि परिणामकारक असतात. याची फक्त पाच इंजेक्शने (0, 3, 5, 14, 28 व्या दिवशी) दंडात घ्यावी लागतात. कुत्रा जर 15 दिवसांनंतर जिवंत राहिला नाही, तर उरलेली दोन इंजेक्शन (60 आणि 90 व्या दिवशी) घेणे आवश्यक आहे.
प्रतिबंधात्मक उपाय ः 1) ग्रामपंचायत व नगर परिषदेमार्फत मोकाट/ बेवारशी कुत्र्याचा बंदोबस्त करावा. ग्राम पंचायत व नगरपरिषदेमार्फत पाळीव कुत्र्याचे नोंदणीकरण करावे.
2) पिसाळलेल्या कुत्र्यांचा नायनाट करावा. त्याचे मृत शरीर जमिनीत खोल गाडून टाकावे.
3) या रोगाचा प्रसार विशेषतः मोकाट कुत्र्यामुळे होतो. त्यामुळे आपले पाळीव कुत्रे त्यांच्या संपर्कात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
4) पाळीव कुत्रा व मांजर यास रेबीज प्रतिबंधक लसीकरण नियमितपणे करून घ्यावे. ही लस सुरवातीला तीन महिने वयाच्या पिल्लास द्यावी व तद्नंतर दरवर्षी एक वेळ या प्रमाणे देऊन घ्यावी. लसीकरण करतेवेळी कुत्रा आजारी नसावा व तत्पूर्वी त्याला जंतनिवारक औषध द्यावे. म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे विकसित होते. तसेच योग्य त्या तापमानास साठवण केलेली, मुदत न संपलेली लस योग्य त्या मात्रेत द्यावयाची खबरदारी घ्यावी.
5) दुधाद्वारे रेबीज पसरण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे, पण दूध नेहमी उकळूनच वापरावे.
6) पिसाळलेला कुत्रा चावलेली गाय, म्हैस, शेळी, मेंढी याचे दूध हाताळते वेळी विशेष काळजी घ्यावी. अन्यथा हातावरील बारीक ओरखडे किंवा जखमांद्वारे रेबीज संक्रमण संभवते. दुधात असलेले विषाणू पोटात गेल्यास दूध पिणाऱ्यास रेबीज रोग झाल्याचे उदा. उपलब्ध नाही. परंतु अशा गाई, म्हशी, शेळी, मेंढीचे दूध उकळून वापरल्याने बाधा होत नाही.
7) रेबीज होऊच न देणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
8) कुत्र्या, मांजराने बारीकसा चावा जरी घेतला किंवा त्यांचा दात लागला आणि रक्त आले तर त्वरित डॉक्टरांना भेटावे.
9) याव्यतिरिक्त ससा, खार, मांजर, वटवाघूळ, उंदीर यांच्यापासून देखील रेबीजची लागण होऊ शकते. या प्राण्यांनी जर तुम्हाला चावा घेतला किंवा नखांची ओरखडले, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डॉ. गजानन ढगे ः 9423139923
डॉ. अनिल भिकाने ः 9423139923
(डॉ. ढगे हे कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, जि. नांदेड येथे विषय विशेषज्ञ,(पशुवैद्यक शास्त्र); तर डॉ. भिकाने हे पशू वैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर येथे कार्यरत आहेत.)