Sunday, October 15, 2017

16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिन

*१६ ऑक्टोबर*

*जागतिक अन्न दिन*

आज जागतिक अन्न दिन. जगभर विविध दिन उत्साहाने साजरे केले जातात. त्यापैकी अन्न दिन महत्त्वाचा मानावा लागेल, कारण त्याचा थेट मानवी जीवनाच्या अस्तित्वाशी संबंध आहे. अन्न सुरक्षेबाबतची एकंदर परिस्थिती पाहता अन्न दिनाबाबत जागरूकता वाढीस लागण्याची गरज आहे. अन्नधान्य मुबलक मिळायला हवे, मात्र ते स्वस्तातच हवे अशी अपेक्षा दारिद्य्ररेषेखालील माणसांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांचीच असते. मध्यमवर्गीयांना तर बाकी काही महागले तरी चालते, पण अन्नधान्य मात्र स्वस्तातच मिळायला हवे असते. मोबाईलपासून ते टी.व्ही., लॅपटॉपपर्यंत कोणतीही गोष्ट ते महागाईची कुरकूर न करता खरेदी करत असतात; मात्र कुटुंबाला महिन्याला चार किलो लागणारी साखर पाच रुपयांनी महागून मासिक खर्चात वीस रुपयांची वाढ झाली तरी ते महागाईच्या नावाने बोंब ठोकतात. तीच गोष्ट कांद्याच्या आणि डाळींच्याही बाबतीत घडताना दिसते. आपल्याला पगार भरपूर मिळावा, मात्र वर्षानुवर्षे मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याने मात्र पंधरा-वीस वर्षांपूर्वीच्याच भावात अन्नधान्य द्यावे असे या वर्गाला वाटत असते. बाजारभावाच्या निम्म्याहून कमी पैसे शेतकऱ्याच्या हातात पडतात हे वास्तवही त्यांना नीट माहीत नसते, किंबहुना ते जाणून घेण्याची निकडही त्यांना भासत नाही.
सध्या अन्न सुरक्षेबाबत आपल्या देशातच नव्हे तर जगभर गांभीर्याने चर्चा सुरू आहे. जगभरातील अर्धपोटी, भुकेल्या लोकांची संख्या तब्बल एक अब्जावर पोचली आहे. भारताची सध्याची लोकसंख्या 1.15 अब्जाच्या दरम्यान आहे. 2050 पर्यंत म्हणजे येत्या 40 वर्षांत ती दीड अब्जांवर जाईल असा अंदाज आहे. जगाची लोकसंख्या 6.15 अब्जांवरून 9.1 अब्जांवर जाणार आहे. या लोकसंख्येला पोसण्यासाठी अन्नधान्य उत्पादनात 70 टक्के वाढ करावी लागणार आहे. सध्या आहे त्या लोकसंख्येला नियमित अन्नपुरवठा करण्याचे मोठे आव्हान असतानाच नवे आव्हान कसे पेलणार, असा प्रश्‍न आहे. तापमानवाढ, मोसमी पावसाची अनियमितता, रोग-किडींचा वाढता प्रादुर्भाव, खते-बियाण्यांसह अन्य कृषी निविष्ठांची अपुरी उपलब्धता, बाजार यंत्रणेकडून होणारी फसवणूक अशी अनेक आव्हाने खांद्यावर घेऊन शेतकरी काळ्या आईची सेवा मनोभावे करतो आहे. तो नवी आव्हाने पेलण्यासही समर्थ आहे, पण किमान पाठीवर हात ठेवून "लढ' म्हणण्याइतके औदार्य समाजाने दाखवायला हवे. सरकारी यंत्रणेनेही त्याच्याप्रती असलेले औदासीन्य सोडायला हवे. निविष्ठांपासून ते पीक कर्जापर्यंत साऱ्या बाबींची वेळेत पूर्तता करून द्यायला हवी. "अन्नदाता सुखी भव' म्हणून आपण यजमानांना दुवा देत असतो, पण खरा अन्नदाता शेतकरी आहे याचा विसर सर्वांनाच पडलेला असतो. या जगाच्या पोशिंद्याचे कल्याण करायचे असेल तर त्याने पिकवलेल्या मोत्यांना वाजवी किंमत देण्याची दानतही समाजाने अंगी बाळगली पाहिजे. जागतिक अन्न दिनाचा हाच संदेश असायला हवा.

Saturday, May 27, 2017

28 मे वीर सावरकर जयंती

#हिंदुहुदयसम्राट_वीर_विनायक_दामोदर_सावरकर
(२८ मे, इ.स. १८८३: भगूर -
२६ फेब्रुवारी, इ.स. १९६६ ) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक,
मराठी भाषेतील कवी व लेखक होते.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील
एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण,
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर
भारतीय राजकारणातील एक
महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व
हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान
मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा
पुरस्कार व जातिभेदाचा तीव्र विरोध
करणारे समाज क्रांतिकारक,
भाषाशुद्धी व लिपिशुद्धी
ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत
साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक
पैलू
सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.
त्यांना स्वातंत्र्यवीर
अशी उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक,
पत्रकार, शिक्षक, चित्रपट
दिग्दर्शक/निर्माते प्रल्हाद केशव
अत्रे यांनी दिली.

सावरकरांचा जन्म नाशिक
जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला.
त्यांचे वडील दामोदरपंत
सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे
दुसरे होते. वि.दा. सावरकरांना
बाबाराव हे मोठे आणि नारायणराव हे
धाकटे भाऊ होते. सावरकरांची आई ते
नऊ वर्षांचे असताना वारली.
थोरल्या बंधूंच्या पत्नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ
केला. सावरकरांचे वडील इ.स.
१८९९च्या प्लेगला बळी पडले.
सावरकरांचे प्राथमिक शिक्षण
नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये
झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत
बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना
ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते.
जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच
ताकदीने चालवत.
त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला
स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र
ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष
देतात.
चाफेकरबंधूंना फाशी दिल्याचे
वृत्त समजताच
लहानग्या सावरकरांनी आपली
कुलदेवता भगवती हिच्यापुढे
"देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र
क्रांतीचा केतू उभारून
मारिता मारिता मरेतो झुंजेन"
अशी शपथ घेतली.
मार्च, इ.स. १९०१ मध्ये विनायकराव
यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले.
लग्नानंतर इ.स. १९०२ साली
फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश
घेतला व इ.स. १९०६ साली उच्च
शिक्षणासाठी लंडनला गेले.
राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त
संघटना सावरकरानी पागे
आणि म्हसकर
ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने
स्थापन केली.
मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त
संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच
संघटनेचे पुढे अभिनव भारत
ह्या संघटनेत रूपांतर झाले. इटालियन
क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ
मॅझिनी ह्याच्या यंग
इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव
दिले गेले होते.
सावरकरांनी पुण्यामध्ये इ.स. १९०५
साली विदेशी कापडाची होळी केली .
श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली
शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून
कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर
लंडनला गेले.
ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात
यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य
टिळकांनी केली होती. लंडनमधील
इंडिया-हाऊसमध्ये राहात
असताना सावरकरांनी जोसेफ
मॅझिनीच्या आत्मचरित्राचे
मराठी भाषांतर केले.
ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत
सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे
तत्त्वज्ञान विषद केले होते.
त्या काळातील अनेक
युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत
होती. लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये
अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले.
मदनलाल
धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य!
मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश
अधिकाऱ्याचा वध करून, हसत-हसत
फाशी स्वीकारली. त्याच काळात
त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक
गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून
बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान
आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व २२
ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात
पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने
नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध
अनंत कान्हेरे या १६
वर्षाच्या युवकाने केला.
या प्रकरणात अनंत कान्हेरे,
कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे
या अभिनव भारताच्या ३
सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर
जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत
होते, तसेच तो बाबाराव सावरकर
(स्वातंत्र्यवीरांचे बंधू)
यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत
ठरला होता, म्हणूनच
क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास
पाठवले.
इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध
भारतात झालेल्या उठावाचा साधार
इतिहास सावरकरांनी लिहिला. 'अठराशे
सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर'
हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे
केवळ एक बंड होय हा इंग्रज
इतिहासकारांचा निष्कर्ष
सावरकरांनी साधार खोडून काढला.
ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ
प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण
सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून
प्रसिद्ध करण्यात यश मिळवले.
ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती.
मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित
सावरकरांचे मित्र
कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर
प्रसिद्ध झाले.
राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध
केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे
थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना
ब्रिटिश शासनाने
जन्मठेपेची शिक्षा देऊन
काळ्या पाण्यावर धाडले.
ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून
लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा
ह्यांनी कर्झन
वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक
येथे अनंत कान्हेरे
ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन
ह्याला गोळ्या घालून ठार केले.
नाशिकच्या ह्या प्रकरणात
वापरण्यात आलेली ब्राउनिंग
जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज
अमीन ह्याच्याकरवी धाडली होती.
ब्रिटिश
सरकारला याचा सुगावा लागताच
त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक
केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात
आणले जात
असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस
बेटाजवळ बोटीतून उडी मारली(इ.स.
१९१०). ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून
त्यांनी पोहत
फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण
किनाऱ्यावरील फ्रेंच
रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे
सावरकरांचे म्हणणे कळले नाही,
आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक
करून भारतात आणले. त्यांच्यावर
खटला भरण्यात आला. त्यांना दोन
जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-
शिक्षा (सुमारे ५० वर्षे
अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात
आली (इ.स. १९११).मॉर्सेलिस येथे
उडी मारताना सावरकरांनी सखोल
विचार केला होता. दोन देशांतील
कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम
करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता.
फ्रान्सच्या भूमीवरून
(त्या शासनाच्या परवानगीशिवाय)
ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार
नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण
तसे घडले नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग
करण्यासाठी ब्रिटिश सरकारने
त्यांना अंदमानच्या काळकोठडीत
ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत
टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले.
नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत
काम दिले. या मरणप्राय वेदना सहन
करीत
असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर
एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य!
तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत
असतानाही सावरकरांचे सर्जनशील
कवित्व आणि बंडखोर
क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले
नव्हते.
बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर
महाकाव्ये लिहिली.
अंदमानच्या काळकोठडीत
सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते
राजकारण दिसत होते.
ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लीम
लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ
करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य
शत्रू राहिलेले नाहीत. ते
कधीतरी हा देश सोडून जाणारच
आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे
आवश्यक आहे हे
सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई
पटेल , रंगस्वामी अय्यंगार
यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे व
खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने
ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य
केल्यामुळे त्यांची अंदमानातून
सुटका झाली.
अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व
सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे
सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे
भाग पडतात. पहिल्या भागात
आक्रमक, क्रांतिकारी सावरकर,
क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर,
धगधगते लेखन करणारे सावरकर -
असे त्यांचे रूप दिसते. तर
त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात
समाजक्रांतिकारक सावरकर, हिंदू
संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ
चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक
सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण
करणारे वक्ते सावरकर,
विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे
आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात
मांडण्याचा प्रयत्न करणारे
तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर -
अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर
आलेले दिसतात.

he was great persnality
अंदमानातून सुटल्यानंतर
सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत
स्थानबद्ध केले (१९२४ जाने.६] ) .
हिंदू समाज एकजीव आणि संघटित
करण्यासाठी सावरकरांनी रत्नागिरीत
राहून कार्य केले. हिंदू
समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था,
चातुर्वर्ण्य (१९३०नोव्हें )
जबाबदार आहे, हे
सावरकरांनी लक्षात घेऊन
त्या विरोधात काम केले. हिंदू धर्मात
जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन
आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन
करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार
उपसली.आपल्या लेखनाने
कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न
करता अंधश्रद्धा, जातिभेद यांवर
त्यांनी कडाडून टीका केली.
स्वकीयातील जातीयतेवरपण
निर्भीड टिका केली.
त्यांनी रत्नागिरीमधील
वास्तव्यामध्ये अनेक
समाजसुधारणा केल्या. जवळपास ५००
मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली.
अनेक आंतरजातीय विवाह लावले.
अनेक सहभोजने आयोजित केली.
त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन
मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी सामाईक
भोजनालयही सुरू केले. [
जातिभेद
तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून
दिला. रत्नागिरी येथे त्यांनी
पतितपावन मंदिर स्थापन केले,
या मंदिरात सर्व
जातींच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे
१५ आंतरजातीय विवाहही
त्यांनी लावून दिले.
एक माकड महासंमेलन आणि दुसरे
भाकड महासंमेलन
सावरकरांनी चालवलेल्या जात्युच्छेदन
चलवळीने अस्वस्थ
झालेल्या ब्राह्मणांनी लोणी येथे
झालेल्या सनातनी परिषदेत
सावरकरांना 'धर्मद्रोही' ठरवून
'त्यांना पेशवाई असती तर
हत्तीच्या पायाखाली दिले गेले असते'
असा ठराव मांडला. त्यावर
३००० ब्राह्मणांनी सह्या केल्या.
सावरकरांनी त्यावर 'शिवशाहीत
अथवा,
पहिल्या बाजीरावाच्या पेशवाईत
आमच्यासारख्या हिंदू
संघटकांना हत्तीच्या पाठीवरील
अंबारीत मिरवले जाण्याचाच संभव
अधिक होता' असे सडेतोड उत्तर
दिले.मायबोली २००८च्या हितगुज
दिवाळी अंकात डॉ. चिन्मय
यांच्या मांडणीप्रमाणे, 'भटशाही'
संपवण्यासाठी पूजा, पाठ, गौरी,
गणपती, सोयरसुतक, संक्रांत,
दिवाळी, दसरा, द्वादशी या धार्मिक
कार्यक्रमांना भटांना बोलावणे बंद
करून 'भटशाही' संपवावी असे मत
मांडले. "त्यासोबतच काशीतील
ब्राह्मण
महासंमेलनाची तुलना त्यांनी माकडांशी केली.
त्यात 'काशीत दोन महासंमेलने
भरली - एक माकड महासंमेलन
आणि दुसरे भाकड महासंमेलन. माकडे
परिवर्तनीय तरी आहेत. पण
सनातनी तर काळ, वेळ,
परिस्थिती या गोष्टीच बघत नाहीत.
अशा वागण्यामुळे निदान
काशीच्या भाकड महासंमेलनातील
पंडित हे तरी माकडांची विकसित
श्रेणी नसून तेथील माकडेच
त्या पंडितांची विकसित श्रेणी आहे हे
म्हणणे क्रमप्राप्त आहे' असे लिहित
त्यांची वीकेट घेतली.
सात बेड्या
सावरकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात
जातिव्यवस्थेवर हल्ला केला.
अनुवंशात जातीचे मूळ आहे.
त्या मुळावरच
सावरकरांनी हल्ला चढवत अनुवंश
हा आचरटपणा आहे, जर
ब्राह्मणाच्या घरी 'ढ'जन्मला तर
त्याला 'ढ'च म्हटले पाहिजे आणि जर
शुद्रात 'ज्ञ' निघाला तर
त्याला 'ज्ञ'च म्हटले पाहिजे, मग
त्याचा बाप, आजा अथवा पणजा 'ढ'
असो की 'ज्ञ' असो.
सावरकरांनी हल्ला करताना 'आपले
हिंदुत्वाचे समर्थक दुखावतील' वगैरे
फाजील भीती न बाळगता त्यांचे
प्रबोधन केले. सावरकर म्हणतात
की 'आज आमच्या हिंदू समाजात
पोथीत तसे लिहिले आहे ह्या सोडून
इतर कोणत्याही लक्षणाने सहज
विभिन्नत्व विविध जातींमधे दिसून
येत नाही. जात मानणे ही मूळ चूक!
त्यात महादेवाच्या जटेपासून ही जात
निघाली आणि ब्रह्मदेवाच्या बेंबीपासून
अमुक जात
निघाली इत्यादी उपरत्या अक्षरशः खऱ्या मानून
त्या त्या जातींच्या अंगी ते ते गुण
उपजतच आहेत हे मानणे ही घोडचूक!!
अन् तो गुण त्या जातीच्या संतानात
प्रकट झाला नसला तरी तो आहेच
समजून तशी उच्च-
नीचता त्या संतानास भोगावयास
लावणे ही पहाड चूक.
जातिव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात
बेड्या मोडायला हव्यात हे सांगितले.
त्या लेखात ते म्हणतात, पोथीजात
जातीभेद हा मनाचा रोग आहे. मनाने
तो मानला नाही की झटकन बरा होतो.
त्यानंतर त्या सात बेड्या म्हणजे
१)वेदोक्तबंदी {स्वतःच्या क्षत्रियादिक
धर्मबंधूंनासुध्दा वेदोक्ताचा अधिकार
नाही असे म्हणणारी भटबाजी यापुढे
चालणार नाही.-सावरकर}२)
व्यवसायबंदी ३) स्पर्शबंदी ४)
सिंधूबंदी ५) शुद्धीबंदी ६) रोटीबंदी ७)
बेटीबंदी. आपल्याकडे
अजूनही बेटीबंदी मोठ्या प्रमाणात
आहे.सावरकरांनी आंतरजातीय
विवाहांना समर्थनच दिले नाही तर
स्वतः आंतरजातीय विवाह लावले.

हिंदू महासभेचे कार्य....
रत्नागिरीत सावरकर सुमारे १३ वर्षे
स्थानबद्धतेत होते. इ.स. १९३७
पासून सुमारे सात वर्षे,
सावरकरांनी हिंदू महासभेचे
अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे,
मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती,
रॉयल क्लब्सची स्थापना अशा अनेक
मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य
केले. त्यांनी आधुनिक
विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व
विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू
धर्मात
सुधारणा करण्यासाठी लढा दिला.
एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक
(महाकवी), समाजसुधारक, हिंदू
संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर
सावरकरांनी भारतीय समाज ढवळून
काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व
योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन
कॉंग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर
विरोध केला.
स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा,
सैनिकांची संख्या वाढवणे,
शस्त्रसज्जता अश अनेक
विषयांचा आग्रह त्यांनी धरला.
सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व
सुराज्य यांसाठी अथक परिश्रम
घेतले. इ.स. १९६६ मध्ये
वयाच्या ८३
व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय
घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २२
व्या दिवशी त्यांचे प्राण पंचतत्त्वात
विलीन झाले.

सावरकर साहित्य
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे
व्यक्तिमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत
प्रतिबिंबित झाले आहे. कवी,
निबंधकार, जीवनदर्शन
घडविणारा नाटककार, राजकीय व
सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित
कादंबऱ्यांचा लेखक, ग्रंथकार,
इतिहासकार , भाषाशास्त्रज्ञ
ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध
रूपे आहेत.
सावरकरांचे पहिले काव्य म्हणजे
वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा
फटका.
सावरकरांनी त्यांच्या कविता महाविद्यालयात,
लंडनच्या वास्तव्यात,
अंदमानच्या काळकोठडीत
आणि रत्नागिरीत रचल्या.
कोठडीच्या भिंतींवर
काट्याकुट्यांनी महाकाव्य
लिहिणारा हा जगातील एकमेव
महाकवी. शब्दलालित्य, भावोत्कटता,
विलक्षण मार्दव व माधुर्य
ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये
आहेत. सुस्पष्ट विचार, तर्कसंगत
मांडणी आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे
सामर्थ्य
ही त्यांच्या निबंधांची बलस्थाने
आहेत.
सावरकर हे इतिहास घडविणारे
इतिहासकार होते.
त्यांचा शिखांचा इतिहास अप्रकाशित
राहिला.
सावरकरांनी विचारप्रवर्तनाबरोबरच
भाषाशुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले.
क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य,
वेशभूषा, दिग्दर्शक, प्राचार्य,
प्राध्यापक, मुख्याध्यापक,
शस्त्रसंधी, कीलक राष्ट, टपाल,
दूरध्वनी, नभोवाणी, ध्वनिक्षेपक,
अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक,
तारण, संचलन, गतिमान नेतृत्व,
क्रीडांगण, सेवानिवृत्तीवेतन, महापौर,
हुतात्मा, उपस्थित असे
शतावधी समर्पक शब्द
सावरकरांनी सुचविलेले आहेत.
वि.दा. सावरकर हे मुंबई येथे १९३८
साली भरलेल्या अखिल भारतीय
मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
होते.
ग्रंथ आणि पुस्तके
वीर सावरकरांनी १०,०००
पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर
१५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत
लिहिली आहेत. फारच
थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक
लिखाण केले असेल.
त्यांच्या "सागरा प्राण तळमळला",
"हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा",
"जयोस्तुते", "तानाजीचा पोवाडा"
ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.
त्यांच्याच कमला
या काव्यसंग्रहातील खालील
ओळी त्यांचा कडवा राष्ट्रवाद
दर्शवितात -
अनेक फुले
फुलती फुलोनिया सुकून जाती
त्याची महती गणती कोणी ठेवली असेल
का?
परी गजेंद्र शुंडे उपटीले,
श्रीहरिसाठी नेले,
फूल ते अमर ठेले मोक्षदाते
पावन.
अमरती वंशवेला निर्वंश
जिचा देशाकरिता,
दिगंती पसरेल सुगंधिता,
लोकहीत परिमलाची.

Thursday, February 9, 2017

17 फेब्रुवारी संत गाडगेबाबा जयंती

डेबूजी झिंगराजी जानोरकर
जन्म: फेब्रुवारी २३, १८७६
शेणगाव अंजनगाव, कोल्हट सुर्जी तालुका, अमरावती जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू: २० डिंसेंबर १९५६
वलगांव (अमरावती)

गाडगे महाराज (फेब्रुवारी २३, १८७६- २० डिंसेंबर १९५६ ) हे ईश्वर कशात आहे सुद्धा नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत.

डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.

बालपण

गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते.
डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडिल दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे डेबूजींचे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.

सामाजिक सुधारणा

१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्यातोंडी गावकर्‍यांना शिकविला.

दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्‍न केले.

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्‍न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वर्‍हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.

त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.

महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत.लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्‍या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्‍या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.

अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे करण्यात आले आहे.

"संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश "

    भुकेलेल्यांना = अन्न
    तहानलेल्यांना = पाणी
    उघड्यानागड्यांना = वस्त्र
    गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत
    बेघरांना = आसरा
    अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार
    बेकारांना = रोजगार
    पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय
    गरीब तरुण-तरुणींचे = लग्न
    दुःखी व निराशांना = हिंमत
    गोरगरिबांना = शिक्षण

हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!

संक्षिप्त चरित्र

    गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले.
    ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे' मंदिर बांधले.
    १९०८ मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला.
    १९२५- मुर्तिजापूर येथे गोरक्षण कार्य केले आणि धर्मशाळा व विद्यालय बांधले.
    १९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाला बांधली.
    "मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
    फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.
    गाडगे महाराज गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.
    १९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.
    गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.
    "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.त्यांचे जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. यातील "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गीत मन्ना डे यांनी गायले.
    आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात'
    १९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.
    १९५४- गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलच्या रोग्यांच्या नातेवाइकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळ धर्मशाळा बांधली.
    गाडगेबाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.
    डॉ आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानत असत.
    २० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू. गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे.
    नाशिक येथील गॊदावरी नदीवरील पुलाला गाडगे महाराजांचे नाव दिले आहे.
    श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट हा गाडगे महाराजांनी बांधलेल्या धर्मशाळांची व्यवस्था पाहतो.

गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज

गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते.

गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    १४ जुलै १९४१ ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. २ घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणार्‍या बाबांनी बाबासाहेबांकडून २ घोंगड्या स्वीकारल्या. पण म्हणाले "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे."

तेव्हा बाबासाहेब म्हणाले "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.

गाडगेबाबांचे विचार

    एकदा गाडगेबाबा रस्त्याने जात असताना...समोर एक व्यक्ती दगडाची पूजा करत असताना त्यांना दिसली. त्याने दगडावर हार चढविला. दुधाने अंघोळ घातली. इतक्यात एक कुत्रा आला आणि मागील पाय वर करून त्या दगडावर मूत्र विसर्जन करू लागला. ती व्यक्ती चिडली. त्याला कुत्र्याचा फार राग आला. तो कुत्र्याला मारण्यासाठी हातात दगड घेऊन धावू लागला. तेव्हा गाडगेबाबा म्हणाले, " बिचार्‍या गरीब मुक्या जनावरांना त्रास का देता ? त्याला हे कुठं माहीत आहे की, माणसांचा देव दगड असतो म्हणून ?"
    पंढरपुरात एकदा टिळकाचे भाषण होते. तेवढ्यात बाबा समोरून येत होते. सगळ्यांच्या माना वळल्या. श्रोत्यांच्या मनातले ओळखून टिळकांनी बाबांना स्टेजवर आणले आणि दोन शब्द बोलायला सांगितले. टिळकांचे अथणीला झालेले भाषण बाबांना ठाऊक होते.. स्टेजवर येताच बाबांनी टिळकांच्या ब्राह्मण पंथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली. बाबा म्हणाले "टिळक महाराज मी चुकलो. आम्ही हयातभर तुमची कापडं धुतली, इस्त्री केली. तवा आम्ही कसे मार्गदर्शन करू? महाराज काय बी करा पण आम्हालाबी ब्राह्मण करा."

गाडगे महाराज यांच्यावरील पुस्तके

    The Wandering Saint (वसंत शिरवाडकर) - श्री गाडगे बाबा प्रकाशन समिती, मुंबई
    आपले संत (एस.ए. कुलकर्णी) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९३)
    कर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे) -लोकवाड्मय गृह, मुंबई (१९९२)
    गाडगेबाबा (वसंत पोतदार) -अक्षर प्रकाशन, मुंबई (१९९९)
    गाडगेबाबांच्या सहवासात (जुगलकिशोर राठी) - विजयश्री प्रकाशन, अमरावती (१९९३)
    गाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार) -योगेश प्रकाशन, पुणे (१९९३)
    दिव्याला गाडगे महाराज (गो. भट) -नवलवय मुद्रणालय, अहमदाबाद (१९८२)
    मानवता के पुजारी संत श्री गाडगे बाबा (स्यमंत सुधाकर) -गाडगेबाबा प्रकाशन समिती, मुंबई (१९९०)
    मुलांचे गाडगेबाबा (रा.तु. भगत) -लोकशिक्षण संस्कार माला कोल्हापूर (१९९२)
    लोकशिक्षणाचे शिल्पकार (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)
    लोकोत्तर गाडगेबाबा जीवन आणि कार्य (द.ता. भोसले) -ग्रंथाली, मुंबई (२००७)
    श्री. संत गाडगे महाराज (मधुकर केचे) -साकेत प्रकाशन, औरंगाबाद (२००४)
    श्री. संत गाडगे महाराज (गो.नी. दांडेकर) -मॅजेस्टिक, प्रकाशन मुंबई (१९९५)
    श्री. संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र (पा.बा. कवडे) -अण्णासाहेब कोरपे चॉरिटेबल ट्रस्ट, अकोला (१९९४)
    श्री. गाडगे महाराज गौरव ग्रंथ (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)
    श्री. गाडगे महाराज शेवटचे कीर्तन (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९५)
    श्री. गाडगेबाबांचे विचार (रा.तु. भगत) -लोकशिक्षण संस्कार माला, कोल्हापूर (१९९६)
    श्री. गाडगेबाबांची पत्रे (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९१)
    श्री. संत गाडगेबाबा विचार धन (ह.रा. हिवरे) -नारायणराव अमृतराव लभडे प्रकाशन (१९९९)
    संत गाडगे महाराज (डॉ. श्याम दयार्णव कोपर्डेकर) - (१९९६)
    संत गाडगे बाबांच्या आठवणी (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)